
अमृतमहाल गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: चिकमंगळूर, चित्रदुर्ग, हस्सन, शिमोगा, तुमकुर, देवनगेरे (कर्नाटक)
वजन: गाय: ३१८ किलो (७०० पौंड), उंची
: १२६ सेंमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
अमृतमहाल किंवा अमृतमहल हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून विशेष करून कर्नाटक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. या जातीचा बैल शेतीकामासाठी उपयुक्त आहे.जास्त वेळ काम, कमी चारा -पाणी अशा प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याच्या गुणधर्मामुळे जरी ही प्रजाती चांगली वाढली तरी पण यामुळे यांची दूध देण्याची क्षमता कमी होत गेली.

आलमपाटी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: मुख आढळ धर्मपुरी जिल्ह्यातील पेन्नागरम, कुरिरी, होगेनक्कल, उट्टमलाई, पेरुमपालाई, एरियुर भागांत तसेच कृष्णगिरी जिल्ह्यातील सीमावर्ती भागात देंकनिकोट्टई, नाट्रमपालयम, अनचेट्टी भागात होता.
या गोवंशाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे लांब पाय, उभारलेले रुंद कपाळ आणि मजबूत शिंगे होय. या गोवंशाला चारा अल्प प्रमाणात लागतो. हा गोवंश श्रमिक कामासाठी जसे की बैलगाडी ओढण्यासाठी व नांगरणीसाठी योग्य आहे. राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन संस्थेच्या निकषानुसार हा गोवंश मशागतीच्या म्हणून ओळखला जातो.

उंबलाचेरी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: किलालयुर , केलवेलूर, थलाईनायर(नागपट्टिनम जिल्हा) , तिरुमरुकल व तिरुवरुर जिल्ह्यातील तटीय क्षेत्र (तामिळनाडू)
वजन: गाय: २१९ किलो (४८० पौंड), उंची
: १०५ सेंमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
चांगला खुराक दिल्यास ही गाय दिववसाला २ ते ४ लिटर दूध देते. परंतु मजबूत, मध्यम बुटका आणि काटक पाय यामुळे भातशेतीमध्ये प्रजातीचे बैल चांगले कामाला येतात. आणि यामुळेच हा गोवंश तामिळनाडूत प्रसिद्ध आहे.
लहानपणी हा गोवंश लाल रंगाचा असतो. एक वर्ष वयानंतर गाई फिक्कट ते गडद राखाडी आणि बैल गडद काळपट राखाडी रंगात परावर्तित होतात.

ओंगल गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: पूर्व गोदावरी, गुंटुर, प्रकाशम किंवा ओंगोल, नेल्लोर तथा कुर्नूल जिल्हा
वजन: गाय: ३८२ किलो (८४० पौंड), उंची
: १३४.९४ सेंमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूत कधीकाळी ही प्रजाती खूप प्रसिद्ध होती. विशेषकरून जलीकट्टू या खेळासाठी या प्रजातीचे सांड वापरले जात असत. यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आणि मजबूत अंगकाठीमुळे या प्रजातीचे बैल शेतीकामासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.हा गोवंश पांढऱ्या रंगाचा असून बैल व सांड हे गाईपेक्षा मोठे व रुबाबदार असतात. या गोवंशाची मान आखूड, राखाडी रंगाची असून डोके मोठे आणि त्रिकोणी असते.

कोकण कपिला गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर
वजन: गाय: २२५ किलो (५०० पौंड), उंची
: १००.७८ सेंमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
कोंकण कपिला हा काटक आणि मध्यम आकाराचा गोवंश आहे. शरीराच्या तुलनेत मध्यम आकाराचे आणि निमुळते डोके असते. या गोवंशाचे डोळे काळे, कान मध्यम आकाराचे, सावध आणि टोकदार असतात. डोळ्याच्या बाजूने मध्यम आकाराची दोन काळी शिंगे असून, शिंग पाठीमागे वर जाऊन किंचित आत वाळलेली आणि टोकदार असतात. दुधासाठी चांगला गोवंश सरासरी प्रतिदिन २. ते ३ लिटर दूध उत्पादन. उष्ण, दमट आणि अति पावसाच्या प्रदेशात, डोंगराळ भागात चरून पोषण.

कंगायम गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: कोइंबतूर, इरोड, दिंडुक्कल, करुर, नामक्कल, (तामिळनाडू)
वजन: गाय: ३८० किलो (८४० पौंड), उंची
: १२४.६ सेंमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
हा मध्यम उंच ते बुटका गोवंश असून हा पांढरा, तपकिरी, लाल व काळ्या रंगात आढळतो. यात उंचीनुसार दोन गोवंश आढळतात.
या गोवंशाचे वैशिष्ट्य म्हणजे जन्मतःच याचा रंग लाल-तांबडा असतो. सहा महिन्यांच्या पुढे हा राखाडी, गडद राखाडी किंवा काळा बनत जातो. विशेषकरून बैलाचा चेहरा, मान, वशिंड आणि पुठ्ठे गडद काळ्या रंगाचे असतात. खुरापासून वर काळे सॉक्स घातल्याप्रमाणे पायाचा रंग असतो.

कासारगोड गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: केरळ आणि कर्नाटक
वजन: गाय:११० किलो, उंची
: ८० सेंमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
कासारगौड, कासारगोड किंवा साह्य हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून केरळ आणि कर्नाटकात आढळतो. याचे उगमस्थान दक्षिण सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यामुळे याला साह्य पशु असे सुद्धा म्हणतात. कर्नाटकातील गौड जिल्ह्यावरून याचे नाव कासारगौड असे पडले.[१]
हा मध्यम बुटका गोवंश असून उत्तम प्रतीच्या दुधासाठी ओळखला जातो. याला केरळातील अति पर्जन्यमान, उष्ण आणि दमट हवामान चांगले मानवते. याची उत्पत्ती कोकण कपिला आणि सुवर्ण कपिला पासून झाली असे मानल्या जाते.

कांकरेज गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: गुजरात मधील कच्छचे रण आणि राजस्थान
वजन: गाय:४०० ते ५०० किलो, उंची
: १४० सेंमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
कांकरेज गाय हा एक भारतीय गोवंश असून गुजरात मधील कच्छचे रण आणि राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. ही गाय तलवड, वाघियार, वागड आदित्यादी विविध नावाने ओळखली जाते. कांकरेज नावाने ही पाकिस्तानात पण प्रसिद्ध आहे. यांची दूध देण्याची क्षमता उत्तम असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.परदेशी देशांमध्ये, कांकरेज मांस उत्पादनासाठी आणि दूध व्यवसायासाठी म्हणून दुहेरी हेतू असलेली एक जाती आहे. ही गाय शरीराने मोठी आहे आणि लांब शिंगे आहेत.

केनकाथा गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: उत्तरप्रदेश
वजन: गाय:४०० ते ५०० किलो, उंची
: १२० सेमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
केनकाथा/केनकथा किंवा केंकाथा हा शुद्ध भारतीय गोवंश असून उत्तरप्रदेश राज्यातील महत्त्वपुर्ण गोवंश आहे. उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड प्रांतातील केन नदीच्या काठावर उगमस्थानामुळेच या गोवंशास केनकाथा असे नाव पडले आहे.
या गोवंशास काही ठिकाणी केनवारीया असेही म्हणतात. हा गोवंश डोंगराळ भाग व उग्र वातावरणात टिकून राहणारा गोवंश म्हणून ओळखला जातो. हा गोवंश मध्यम दूधारू आहे. या गोवंशचे बैल लहान परंतु अत्यंत बळकट असतात, तसेच ते जडकामासाठी फार उपयुक्त असतात. या गोवंशाच्या गायीचे दुधाचे उत्पादन १ ते ३ लिटर प्रतिदिन पर्यंत असते.

कोसली गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: छत्तीसगड, रायपूर, दुर्ग, राजनांदगांव, बिलासपूर, जांजगिर-चांपा
वजन: गाय: १५० ते २०० किलो, उंची
: १०० सेमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
कोसली गोवंश (अर्थात गाय आणि बैल) हा आकाराने लहान परंतु मजबूत शरीराचा असतो. या गोवंशाचा रंग प्रामुख्याने लाल किंवा पांढऱ्या ठिपक्यांचा लाल अशा स्वरूपात असतो.
या गोवंशाच्या गायीचे वशिंड लहान असते तर बैलाचे वशिंड मध्यम व मजबूत असते. पाय सरळ, लहान व मजबूत असतात. शिंगे लहान आकाराची, सरळ वर जाऊन वळलेली असतात. या गोवंशातील गाईंचे कपाळ सपाट व सरळ असते. डोळ्यांच्या पापण्या आणि खुराचा रंग काळा असतो. कानाचा आकार मध्यम तीक्ष्ण असून ते आडवे असतात

कृष्णा गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि सोलापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव, बिजापूर आणि रायचूर
वजन: गाय: २८०–२४१ किलो, उंची
: 118 सेंमी
आयुर्मान: २५ वर्षे
याची निर्मिती अंदाजे इ. स. १८८०नंतर झाल्याचे मानले जाते. कृष्णाखोऱ्यातील चिकट आणि चिवट जमिनीच्या मशागतीसाठी तत्कालीन मराठा राजांनी गीर, कांकरेज आणि ओंगल या भारतीय गोवंशाच्या देशी संकर आणि निवड पद्धतीने या गोवंशाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले.हा गोवंश अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या भारतीय गोवंशापैकी एक आहे.

खेरीअर गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: ओडिशा राज्यातील नुआपाडा जिल्ह्यातील खेरीअर/खरियार
वजन: गाय: १५६ किलो, उंची
: १०२ सेमी
आयुर्मान: ४ वर्षे
खेरीअर हा मुळात मशागतीचा गोवंश आहे. बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी केला जातो. हे शांत, लहान आकाराचे, बलवान प्राणी आहेत, उष्णता आणि दुष्काळ सहन करतात आणि रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी असतो. हे त्यांच्या डोंगराळ आणि लहरी हवामान असलेल्या मूळ प्रदेशांभोवती सापडतात.
राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाच्या (NDDB)' निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो. या गोवंशाची विशेष काळजी घेतल्यास हा चांगला 'दुधारू गोवंश' ठरू शकतो.

खेरीगढ गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान:खेरी जिल्हातील खिरीगड,पीलीभीत, शहाजहापूर, सीतापूर, जिल्हांमध्ये तसेच पऱ्हेर, मांजरा या विभागात, तरई
वजन: गाय:३१० ते ४२० किलो, उंची
: १२० ते १३० सेमी
आयुर्मान: १८ ते २० वर्षे
हा गोवंश खास करून कष्टाच्या कामासाठी, ओझे वाहून नेणे व तत्सम अवजड कामांसाठी वापरला जातो. हा गोवंश अतिशय परिश्रम करणारा गोवंश म्हणून प्रसिद्ध आहे. अशा कष्टाच्या कामांमुळे या गोवंशाचे बैल खुप खादाड असतात. या गोवंशाच्या गायी फारशा दुधारू नसतात.हा गोवंश प्रामुख्याने पांढऱ्या किंवा राखाडी रंगामध्ये आढळतो. चमकदार डोळे आणि लहान पण अरुंद कान असतात. बैलाचे वशिंड (खांदा) दिसायला मोठे, मजबूत व शक्तिशाली असते तर गायीचे वशिंड मध्यम आकाराचे आढळते.

खिल्लार गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर
वजन: गाय: २१०–२१९ किलो, उंची
: १२६.५७ सेंमी
आयुर्मान :२५ वर्ष
हा महाराष्ट्रातील लोकप्रिय गोवंशांपैकी एक असून या गोवंशाला महाराष्ट्राची शान असे म्हणतात .या गोवंशात प्रांतानुसार खालील मुख्य उपजाती आहेत - काजळी खिल्लार, कोसा खिल्लार, गाजरी खिल्लार, हरण्या खिल्लार, इत्यादी. या गोवंशाच्या गायी इतर गोवंशापेक्षा कमी दूध देतात अशी समजूत आहे.या गोवंशाचा रंग सहसा पांढरा असतो. काही प्रमाणात किंचीत मळकट रंग सुद्धा आढळतो. कातडी घट्ट चितकलेली व चमकदार असते.

गवळाऊ गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि मध्य प्रदेशचा काही भाग
वजन: गाय: ३०० ते ४०० किलो, उंची
: १२० ते १३५ सेंमी
आयुर्मान १५ ते २० वर्ष
गवळाऊ गाय ही गायीची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भाग आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आढळते. हा देशी गोवंश आहे. हा गोवंश नंद गवळी या लोकांकडून पाळला जातो आणि इतर शेतकऱ्यांना ते बैल आणि गाय विकतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. ह्या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण 5.5 इतके असते. गवळाऊ गायी कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. देशी गायीचे गोमूत्र आणि शेण जमीन, पिकांसाठी-शेती साठी खुप उपयुक्त असते. त्यामुळे देशी गोवंश वाचविणे आज गरजेचे झाले आहे.

गंगातिरी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: गंगा नदीचा बिहारचा पश्चिमी भाग आणि उत्तर प्रदेशचा पूर्वभाग
वजन: गाय: २४० किलो, उंची
: १२५ सेंमी
आयुर्मान १५ ते २० वर्ष
गंगातिरी हा शुद्ध भारतीय गोवंश असून याची उत्पत्ती गंगा नदीचा बिहारचा पश्चिमी भाग आणि उत्तर प्रदेशचा पूर्वभागातील पट्ट्यातील आहे असे मानल्या जाते.
याला पूर्वी शहाबादी किंवा हरियाना नावाने सुद्धा ओळखल्या जात असे. पांढरा शुभ्र रंग आणि गंगा किनारी याचा आढळ असल्याने याला गंगातिरी असे नाव पडले.
हा गोवंश उत्तरप्रदेशच्या चंदौली, गाझिपूर व बलिया जिल्ह्यात, तसेच वाराणसी, मिर्झापूर, भोजपूर, रोहतास भागात आणि बिहारच्या शहाबाद, भभुआ, बक्सर, अरहा, छपरा भागात मोठ्याप्रमाणात आढळतो

गीर गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: गुजरात
वजन: गाय: ४०० ते ४७५ किलो, उंची
: १३० ते १४० सेंमी
आयुर्मान: २० ते २५ वर्षे
गीर गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात, विशेष करून गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता २०-२५ लिटर प्रतिदिन आहे. ब्राझीलमध्ये या गाईचे संवर्धन करून दूध देण्याची क्षमता ४०-५० लिटर प्रतिदिन पर्यंत वाढवलेली आहे. अमेरिकेतील ब्राह्मण गायीच्या निर्मितीतील ही एक प्रजाती आहे

घुमुसरी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: गंजम जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि फुलबनी शहर
वजन: गाय: १६६.८ किलो, उंची
: १२६.२७ सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
घुमुसरी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः ओरिसामधील गंजम जिल्ह्याचा पश्चिम भाग आणि कंधमाल जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या फुलबनी प्रांतात आढळतो.[१] या गोवंशाला बोली भाषेत घुमसरी, गुमसूर तथा देशी गोवंश म्हणून सुद्धा ओळखले जाते.हा गोवंश अंगाने लहान, काटक आणि शिडशिडीत असून बहुतेक वेळा हा पांढऱ्या रंगात आढळतो.या गोवंशाचे डोके लहान असून कपाळ मोठे आणि सपाट असते, तसेच कपाळावर छोटी खाच असते.

जवारी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: उत्तर कर्नाटक मधील हैद्राबाद कर्नाटक (आत्ताचे नाव कल्याण कर्नाटक) तसेच हुबळी, विजापूर
वजन: गाय: २५० ते ३५० किलो, उंची
: ११० ते १२५ सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
हा आकाराने मध्यम आणि काटक बांध्याचा गोवंश आहे. चेहरा मध्यम, सरळ आणि मजबूत जबडा असून याचे कान सुद्धा लहान आणि टोकदार असतात. शिंगांचा आकार मध्यम असून पाठीमागे वळलेले असतात. पायांचा आकार मध्यम आणि काटक असतो. या गोवंशाचा रंग गडद लाल, काळा, तपकिरी किंवा मिश्र असतो. मध्यम प्रकृती, काटक शरीर, शांत आणि लाजाळू स्वभाव असे याचे वैशिष्ट्य आहे. स्थानिक वातावरणात मिसळलेला, चांगली रोगप्रतिकारक शक्ती यामुळे हा गोवंश फारसा आजाराला बळी पडत नाही.

थारपारकर गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील खानदेश
वजन: गाय: ४०० ते ४७५ किलो, उंची
: १३५ ते १४० सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
पांढरा रंग, मांसल, मध्यम ते उंच शरीर. पाठीवर/खांद्यावर राखाडी रंग किंवा राखाडी पट्टे, लांब कान, लांब काळी झुपकेदार शेपटी, मध्यम आकाराचे डोके आणि छोटी शिंगे, ही या जातीची वैशिष्ट्ये. यांची दूध देण्याची क्षमता उत्तम असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.[१] भारतातील उत्तम दूध देणाऱ्या गाईंमध्ये थारपारकर गाईची गणना होते. उष्ण व शुष्क वातावरणात अधिवास, मध्यम खुराक अशा प्रकारच्या परिस्थितीत सुद्धा ही गाय सहज टिकते. या जातीच्या गायी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा उत्तम दूध देतात. सामान्यपणे रोज १० ते १३ लिटर दूष देतात.

थुथो गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: नागालँड
वजन: गाय: ३०० ते ३५० किलो, उंची
: ११० ते १२५ सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
थुथो गाय हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ उगमस्थान नागालँड राज्यातील आहे. या गोवंशाला “आमेशी”, “शेपी”, “चोकरू” आणि “त्सेसो” असेही म्हणतात. नागालँडमधील सर्व जिल्ह्यांमध्ये थुथो गुरे उपलब्ध आहेत. ही जात प्रामुख्याने मांस, शेतीची मशागत आणि शेतीसाठीच्या खतासाठी वापरली जाते. प्राणी डोंगराळ प्रदेशात चांगले जुळवून घेतात आणि पावसाळ्यातही ते डोंगर उतारावर चरण्यास सक्षम असतात.

दज्जल गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: पंजाब
वजन: गाय: ४०० किलो, उंची
: ११० ते १२५ सेंमी
आयुर्मान १८ ते २० वर्षे
पंजाब प्रांतात भगनारी गायी नंतर या गोवंशाचा दूधारू गोवंश म्हणून नंबर लागतो. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा टिकून राहणारा गोवंश म्हणून देखील या गोवंशाची ओळख आहे. या गोवंशाचे बैल शेतीकाम, ओझे वाहून नेने आणि बैलांच्या शर्यतींसाठी वापरतात. तर गायी दुग्धोत्पादनासाठी जोपासल्या जातात. भरलेल्या अंगामुळे हा पाकिस्तान प्रांतात मांसाहारासाठी देखील वाढवला जातो.

देवणी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: लातूर, धाराशिव, परभणी जिल्हासह कर्नाटकातील बिदर
वजन: गाय: २९५ किलो, उंची
: १२२ सेंमी
आयुर्मान : २० ते २२ वर्षे
देवणी गाय हा एक भारतीय गोवंश असून लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात जास्त प्रसिद्ध आहे. ही गाय लातूर, धाराशिव, परभणी जिल्हासह कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.या गोवंशाचे कपाळ मोठे आणि फुगीर असून, कान लोंबते व टोकाशी किंचित दुमडलेले असतात. शिंगे समान अंतरावर असून आकाराने मध्यम असतात.

धन्नी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: पंजाब
वजन: गाय: १३० किलो, उंची
: १२0 सेंमी
आयुर्मान : २० ते २२ वर्षे
धन्नी किंवा धानी हा शुद्ध भारतीय गोवंश असून या गोवंशाची उत्पत्ती भारत आणि पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात झाली असल्याचे मानले जाते. हा गोवंश विशेष करून दोन्ही देशातील पंजाब प्रांतात आढळतो.हा गोवंश आकाराने मजबूत आणि मध्यम असतो. या गोवंशाचे डोके तुलनेने लहान असते. पाठीचा आकार सरळ आणि सपाट असतो. कातडी घट्ट असून शरीराला चिटकलेली असते. या गोवंशाची शिंगे आकाराने लहान असतात.

नागोरी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: राजस्थानामधील नागौर जिल्हा, जोधपूर जिल्हा
वजन: गाय: २८० ते ३५० किलो, उंची
: ११० ते १२० सेंमी
आयुर्मान : २० ते २२ वर्षे
नागोरी किंवा नागौरी (इंग्रजी:Nagori) हा शुद्ध भारतीय गोवंश असून, राजस्थानामधील एक उत्तम गोवंश म्हणून ओळखला जातो. मुख्यतः नागौर जिल्हा, जोधपूर जिल्हा यांच्या परिसरात हा गोवंश आढळतो. या गोवंशाचे मूळ उत्पत्तीस्थान राजस्थानातील 'सुहालक प्रदेश' नागौर आहे.या गोवंशाचा रंग संपूर्ण पांढरा असतो. क्वचितच काळा सापडतो म्हणजे १०० गायींमध्ये चुकून एखादी काळी गाय आढळते. जन्मापासून वासरे संपूर्णपणे पांढऱ्या रंगाची असतात. सर्वसामान्यपणे या गोवंशाच्या गायी मजबूत बांध्याच्या असतात; शरिराची ठेवण आटोपशीर असते.

नारी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: गुजरात राज्यातील बनासकांठा व साबरकांठा,हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश
वजन: गाय: ३५० ते ५५० किलो, उंची
: ९४ ते १२५ सेंमी
आयुर्मान : २० ते २२ वर्षे
नारी हे नाव नार या शब्दावरून पडले आहे ज्याचा अर्थ डोंगर आहे. प्रजनन मार्गामध्ये गुजरातमधील बनासकांठा आणि साबरकांठा जिल्ह्यांचा समावेश होतो; राजस्थानातील पाली आणि सिरोही जिल्हे. बहुसंख्य नारी गुरांची लोकसंख्या आरवली वनपरिक्षेत्राच्या आसपास आढळते. हे प्रदेश किंचित डोंगराळ आणि लहरी क्षेत्र आहेत. अरवलीच्या पायथ्याशी असलेल्या भागात हे प्राणी उष्ण हवामानाशी जुळवून घेतात. प्राण्यांचा रंग पांढऱ्या किंवा राखाडी पांढऱ्या रंगापासून बहुतेक प्राण्यांमध्ये बदलतो आणि बैल पांढरे, राखाडी पांढरे किंवा काळे असतात.

निमारी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: मध्यप्रदेशच्या नर्मदेच्या खोऱ्यात आणि महाराष्ट्रातील जळगाव
वजन: गाय: ३०० ते ४५० किलो , उंची
: ११० ते १३० सेंमी
आयुर्मान : १५ ते २० वर्षे
निमारी किंवा निमाडी (इंग्रजी:Nimari) हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः मध्यप्रदेशच्या नर्मदेच्या खोऱ्यात आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो.[१]. हा गोवंश गीर आणि खिल्लारी या दोन भारतीय गोवंशाच्या संकरातून निर्माण केल्या गेलेला आहे.मध्यम ते उंच बांधा हे याचे मुख्य वैशिष्ट्य असून, याचा रंग लाल/तपकिरी असतो. शरीरावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात. काही ठिकाणी गडद रंग पण दिसून येतो. शरीर बांधा आकर्षक, लांब व उंच असून डोके सुद्धा मोठे लांब असते.

डागरी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: गुजरातमधील गोधरा, पंचमहाल, दाहोद, नर्मदा, छोटाउदेपूर आणि महीसागर
वजन: गाय:२७५ ते ३५० किलो , उंची
: ११० ते १३० सेंमी
आयुर्मान : १५ ते २० वर्षे
या गोवंशाला चाऱ्याची कमी गरज असते. खास पौष्टिक आहार जरी नाही दिला तरी मुख्यतः चरण्यावर टिकून राहते. गुजरात मध्ये या गोवंशाची संख्या अंदाजे २,८०,००० आहे. हा गोवंश ग्रामीण भागात तसेच आदिवासी भागात मुख्यतः घरगुती वापरासाठी सांभाळला जातो.गायी कमी प्रमाणात दूध देतात. दूध उत्पादन १.५ ते ३ किलो/दिवस इतकेच असते. प्रति दुग्धपान सरासरी दुधाचे उत्पादन ३१६ किलो (७५-६५० किलो पर्यंत) असते आणि सरासरी दुधाचे फॅट ४.०८ % (३ ते ५.५ % पर्यंत) असते.

डांगी गाय
मूळ देश: भारत
आढळस्थान: महाराष्ट्रातील नाशिक,नंदुरबार, धुळे, व अहिल्यानगर
वजन: गाय: ३२० ते ४५० किलो , उंची
: ११५ ते १२० सेंमी
आयुर्मान : १५ ते २० वर्षे
डांगी गाय हा एक भारतीय गोवंश असून महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता ही जवळपास ६ लिटर (एका वेळेचे) पर्यंत असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे. ही प्रतिकूल परिस्थितीत उत्तम टिकणारी गाय आहे. ठाणे जिल्हा देखील जवळ असल्याने त्या भागात देखील या गाई पाहायला मिळतात.या गोवंशामध्ये संपूर्ण पांढऱ्या रंगावर काळे लहान आकाराचे गोल ठिपके असतात. मस्तक रुंद असून शिंगे लहान, गोलाकार असतात तर डोळे काळे, पाणीदार असतात.